कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिर्डीचे साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले असून, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, २२ तारखेपर्यंत शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर करण्याची मुदत होती. काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा सांगितल्याने तिढा निर्माण झाला होता.

मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाला. तर राष्ट्रवादीकडे असलेले पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे ठरले.

मुंबईतील सिध्दीविनायक देवस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेकडे कायम असणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानावर १७ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत. त्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी सहा तर शिवसेनेला पाच असे वाटप करण्यात आले आहे.

संस्थानच्या अध्यक्षपदासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमदार काळे हे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव तर माजी खासदार दिवंगत शंकरराव काळे यांचे नातू आहेत.