‘त्या’ युवकाची आत्महत्या नसून, घातपात ! मृत्यूची चौकशी करण्याची आरपीआयची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- घोडेगाव कौठा येथील युवकाची आत्महत्या नसून, घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करुन सदर प्रकरणी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी चौकशी होत नसल्याने, आरपीआयच्या वतीने गुरुवार दि.26 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, दिनेश पाडळे, पप्पू डोंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

घोडेगाव कौठा (ता. नेवासा) येथील युवक दिगंबर घनश्याम राऊत याचा मृतदेह दि.8 जुलै रोजी गट नंबर 135 या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलीस स्टेशनला आत्महत्येची नोंद झाली आहे.

मात्र सदर युवकाने आत्महत्या केली नसून, सदर मृत्यू संशयास्पद आहे. या प्रकरणी आरपीआयने सदर मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मात्र पोलीस व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नसून, सदर युवकाच्या मृत्यूची सखोल चौकशी होण्याच्या मागणीसाठी राऊत कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.