अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिर्डीचे मंदिर बंद झाल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले. भविष्यात दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, शिर्डीत युद्धपातळीवर कोविड लसीकरण करणे, हाच एकमेव पर्याय शिल्लक राहीला आहे.
शिर्डी व परिसराचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, तरच साईदर्शन व अर्थकारण पुढे सुरळीत सुरू राहील. संसर्गाच्या फैलावाची भीती कमी होईल.
परिस्थिती पाहून लसीकरण झालेल्या भाविकांनाच मंदिर प्रवेश हा पर्याय समोर ठेऊन अडचणीच्या काळातही मंदिर सुरू ठेवता येईल.
पहिल्या लाटेत बंधने पाळून दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली. त्याकाळात साडेतीन ते चार महिन्यांत साईमंदिराला अवघे चोवीस कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
सध्या केवळ कामगारांच्या वेतनापोटी वार्षिक नव्वद कोटी रुपये खर्च करावा लागतो. शिर्डी व परिसरातील गावांची दीड लाख लोकसंख्या गृहित धरली, तर त्यापैकी सुमारे चाळीस हजार लोकांना कोविड लशीचा पहिला डोस मिळाला आहे.
एक लाख डोस हवे आहेत. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च येईल. दुसरा डोस सरकारी यंत्रणे मार्फत मिळत राहील. खरोखरच युद्धपातळीवर लसीकरण करता आले, तर शिर्डी भोवतालचा अर्थिक संकटाचा विळखा सैल करण्यास भविष्यात मोठी मदत होईल.