पारनेर कारखाना विक्री प्रकरणात घोटाळा: पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, मांडली ‘ही’ भूमिका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणात घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीवर दोन वर्षांपासून कारवाई का केली जात नाही, याबाबत पोलिस अधीक्षक अहमदनगर यांनी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

यासंदर्भात नगर पोलिसांनी, अर्ज निकाली काढून हे प्रकरण सहकार विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्याचे तक्रारदारांना कळविले आहे, असे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केले आहे. पारनेर कारखान्याच्या विक्रीत घोटाळा झाल्याची तक्रार कारखान्याचे सभासद रामदास घावटे व बबनराव कवाद यांनी दाखल केली होती.

पोलिस त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. या तक्रारी सोबत आर्थिक फसवणूक व मनी लॉण्डरींग झाल्याबाबतचे पुरावे जोडण्यात आलेले होते. परंतु पुढे हि तक्रार साखर आयुक्तांनी निवारण करावी असा दिशाभुल करणारा पवित्रा पोलिसांनी न्यायालयासमोर घेतला आहे.

पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करता येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

तक्रारदारांची मागणी चुकीची आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दखलपात्र गुन्ह्याचा प्रकार आढळून येत नाही. फिर्याद मोघम स्वरूपाची आहे. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे त्यांची मागणी फेटाळण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

यासंबंधी तक्रारदार घावटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृती समितीतर्फे देण्यात येणार लढा, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारखान्यावर येऊन केलेल्या आरोपामुळे हे प्रकरण गाजले होते.

मात्र, पोलिसांची ही भूमिका मान्य नसून आम्ही आमच्याकडील पुरावे न्यायालयात सादर केले असून कायदेशीर लढाई सुरू राहील, अशी माहिती तक्रारदार रामदास घावटे यांनी दिली.