अहमदनगर जिल्ह्यात ह्या बाजारसमितीत कांद्याला १८१९ रुपये भाव !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rates : कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर गुरूवारी (दि. ३) रोजी कांद्याला १८१९ रुपये भाव मिळाला. तर आवक १२ हजार ४६० क्विंटल एवढी झाली.

एक नंबर कांद्याला १४२५ ते १८१९ रुपये भाव मिळाला, तर दोन नंबर कांद्याला ८०० ते १४००, तीन नंबर कांद्याला ३०० ते ७०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती साहेबराव रोहोम यांनी दिली.

याबाबत रोहोम यांनी पत्रकात सांगितले, की कोपरगाव बाजार समितीमध्ये उघड लिलावाच्या बोलीने सर्व भुसार व कांद्याचे लिलाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगले भाव मिळतात.

बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतकऱ्यांच्या पट्टीत कुठलीही कपात केली जात नाही, तसेच पैशाची हमी असून २४ तासाच्या आत रोख अथवा आरटीजीएसने पेमेंट केले जाते, असे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सांगितले.

कोपरगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी बाहेरील राज्यातील व्यापारी आलेले असल्याने कांद्याचे बाजारभाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगाव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार समिती शिरसगाव- तिळवणी येथे विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती रोहोम, उपसभापती परजणे, सचिव एन. एस. रणशुर व संचालक मंडळाने केले आहे.