पावसाचा जोर ओसरला मात्र धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-जुलै महिन्यात वरुणराजाने जोरदार आगमन केल्याने गेल्या दहा दिवसांतच जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये पाणी साठा वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान मागील दोन दिवसांत जोर ओसरला आहे.

मात्र सलग दहा दिवस कोसळलेल्या जलधारांनी मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांचे पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचवल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच पुढील चार दिवसांत पुन्हा पावसाला जोर चढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने जिल्ह्यातील मोठी धरणे ओसंडण्याच्या टप्प्यात आली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आजच्या स्थितीला उत्तर नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या भंडारदर्‍याचा पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहचला आहे.

पातळी नियंत्रणासाठी आवक होत असलेल्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठाही आता पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या मुळा धरणातही आज सकाळी 61.15 टक्के पाणी जमा झाले असून त्यातील 53 टक्के पाणी उपयुक्त आहे.

गेल्या आठवड्यात आवेशाने वाहणार्‍या मुळानदीचे पात्र आटले असून सध्या मुळा धरणात 3 हजार 212 क्युसेक्स वेगाने पाणी जमा होत असून मागील चोवीस तासांत धरणात 227 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे.

मागील दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात मंदावला असून धरणांमध्ये होणारी नवीन पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. मात्र तरीही सद्यस्थितीत मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.