अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- गेल्या दोन दिवसात रॅपिड अँटिजेन किटचा पुरवठा झाला नसल्याने कोपरगावात शनिवारी शेवटच्या शिल्लक ८५ किटद्वारे संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
त्यामुळे आता येणाऱ्या इतर रुग्णांना तपासायचे कसे हा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. दरम्यान कोपरगाव शहरासह तालुक्यात गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खुद्द राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगावात येऊन जास्तीत जास्त व्यक्तीच्या तपासण्या करून बाधित रुग्णांचे विलगीकरण करा असे आदेश दिले होते.
त्यानुसार कोपरगावातील आरोग्य यंत्रणा रॅपिड अँटिजेन किटद्वारे दररोज ३०० पेक्षा जास्त व्यक्तींची तपासणी करून त्यातील १०० पेक्षा जास्त रुग्ण बाधित आढळत होते. त्यानुसार बाधित रुग्णांचे तत्काळ विलगीकरण केले जात होते.
त्यामुळे बाधितांपासून इतरांना होणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास सोपे होऊ लागले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुरवठाच झालेला नाही.
त्यामुळे आता कीट संपल्याने तपासणीच होणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे रॅपिड अँटिजेन किटचा जास्तीत जास्त पुरवठा होणे गरजेचे आहे.