अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यातील १३३ शाळा व महाविद्यालयांची घंटा वाजली असली तरी उर्वरित १ हजार १५३ शाळा, महाविद्यालये मात्र बंदच आहेत.
कोरणा मुक्त झालेल्या गावात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला होता मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव व पालकांची संमती असणे आवश्यक होते.
मात्र आतापर्यंत केवळ १० ग्रामपंचायतींनीच शाळा सुरू करण्याबाबतचे ठराव घेतले होते. कोरोना मुक्त झालेल्या नगर जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १३३ शाळा व महाविद्यालये सुरू झाले आहेत. आदिवासी तालुका असलेल्या अकोलेत सर्वाधिक ४५ शाळा व महाविद्यालये सुरू झाले आहेत. सर्वात कमी कर्जत तालुक्यात केवळ एक शाळा सुरू झाली आहे.
नगर जिल्ह्यासाठी आदर्श असलेल्या हिवरेबाजार कोरोना मुक्त पॅटर्न असलेल्या नगर तालुक्यात गुरुवारी केवळ सात शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. पारनेर व श्रीरामपूर तालुक्यात केवळ दोन शाळा सुरू झालेल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. पारनेर, श्रीगोंदे तालुक्यात ही संख्या मोठी आहे. त्यातच गुरुवारपासून शाळा, महाविद्यालय सुरू झाले. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येणे टाळत आहेत. शिवाय पालकही संमती देत नाहीत.