सोशल मीडिया शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान हवामान अंदाज ते शेतीमाल खरेदी विक्री…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Social Media : विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे.

अशा परिस्थितीत अचूक हवामान बदल, घरगुती बी-बियाणे, पशूधन, शेती औजारे, तयार शेतीमाल याची खरेदी विक्री या सर्वांसाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. शेतीविषयक माहिती व खरेदी-विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या अनेक साईट्स वापरत आहेत.

अतिवापरामुळे समाजात एकीकडे सोशल मीडियाचे दुष्परीणाम दिसत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र हे माध्यम वरदान ठरले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आला आहे. इंटरनेटच्या आधारे क्षणात परिसरातील वार्ता सहज उपलब्ध होतात.

त्यात बळीराजाही आता मागे राहिला नाही. शेतीच्या हंगामाची तयारी करताना शेतकरी मोबाईल फोनचा आधार घेत आहेत. परिसरातील शेतीविषयक माहितीबरोबर दुसऱ्या भागातील प्रयोगशीलता सहजपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे.

आता मान्सून जवळ आल्याने बळीराजा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत, वेध लागले आहेत पेरणी व विविध भाजी पाला, फळबाग आदीच्या लागवडीचे.

त्यात खत व्यवस्थापन, पिकातील अंतर, औषध फवारणी, त्याची मात्रा आदींची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने यासाठी शेतकरी सोशल मीडियाचा आधार घेत आहे. तालुका तसेच गाव पातळीवर सोशल मीडियाचे ग्रुप करून विविध पीके, त्यांची लागवड करण्याच्या पद्धती आदींच्या माहितीची देवाण-घेवाण करत आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी आपल्याजवळील बियाणे,

पशूधन याची जाहिरात करून खरेदी-विक्री करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे पेरणी व लागवडीचे व्हीडीओ शेअर करत आहेत. कमी खर्चात कशा प्रकारे चांगले पीक घेता येईल, याची माहिती शेअर करत आहेत. सोशल मीडियावर रोज अनेक लिंक मोबाईलवर येत असतात.

त्यांना कनेक्ट होण्यापूर्वी त्याची शहानिशा करण्याची गरज आहे. नाही तर आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडू शकतो. यासाठी शेतकरी बांधवांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिकाबाबत येणारा सल्ला व माहिती याची शाहानिशा करून अंमलात आणणे गरजेचे आहे.