मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शेंडी, ता.नगर येथील महिला सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रविवारी (दि. १९) गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली. तसेच सरपंच लोंढे यांच्या बॅनरला काळे फासले.
सरपंच लोंढे यांनी शनिवारी (दि.१८) रात्री गावातील शेंडी पोखर्डी वार्ता या व्हॉट्स अप ग्रुपवर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले.
त्याचे तीव्र पडसाद रविवारी (दि.१९) दिवसभर गावात दिसून आले. सकाळी गावातील दत्त मंदिर परिसरात गाव आणि परिसरातील नागरिक एकत्र येत निषेध सभा घेण्यात आली. त्यांनतर संतप्त ग्रामस्थांनी गावात मोठी रॅली काढत निषेधाच्या घोषणा दिल्या.
संतप्त तरुणांनी सरपंच प्रायगा लोंढे यांचा फोटो असलेल्या गावातील बॅनरला काळे फासले. जोपर्यंत सरपंच लोंढे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही, असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला.
दिवसभर शेंडी गाव पूर्णपणे बंद होते व गावात तणावाचे वातावरण होते. यावेळी शेंडीचे माजी सरपंच सीताराम दाणी, कापुरवाडीचे सरपंच सचिन दुसुंगे, वारूळवाडीचे सरपंच सागर कर्डिले, पोखर्डीचे सरपंच अंतू वारुळे, माजी सरपंच रामेश्वर निमसे, अजय महाराज बारस्कर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच प्रयागा लोंढे यांच्या विरोधात माजी सरपंच सीताराम दाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सरपंच लोंढे यांनी गावातील शेंडी पोखर्डी वार्ता या व्हाट्स अप ग्रुपवर अक्षय भगत याचे पोस्टवर आक्षेपार्ह वक्तव्य करुन सर्व समाजाच्या भावना दुखावलेल्या आहे
तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच लोंढे यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.