अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- नगर बाजार समितीच्या जागा व गाळे विकून पोट भरणारेच न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही केलेल्या कामांच्या ठिकाणी फोटो सेशन करून जातात.

पण जनतेला सर्व माहिती आहे.अशी अत्यंत कडवी टीका माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केली आहे. नगर तालुक्यातील साकत येथे एका इमारत लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आज बाजार समितीत सत्तेत असलेली मंडळी खा.डॉ.सुजय विखे यांच्या सोबत फिरतात. पण खा.विखेंच्या कामाची पध्दत वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीवेळी कोणी काय केले हे त्यांना चांगले माहिती आहे.

ते काहीही विसरलेले नाहीत. योग्य वेळी सगळं बरोबर करतील. याची प्रचितीही बाजार समितीला लुटणार्‍यांना लवकरच येईल. आज अनेक गावच्या विकासासाठी तरूणाई पुढे येत असून त्यांना ताकद देण्याचे काम येणार्‍या काळात केले जाईल.

असेही ते म्हणाले. संदीप गुंड म्हणाले की, नगर तालुक्यात महाविकास आघाडी भक्कम असून सर्वसामान्यांचा आघाडीवर विश्वास आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण आघाडीला आहे.

विरोधकांनी कितीही आव आणला तरी जनता भूलथापांना बळी पडणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात भरीव विकासकामे करण्यात येत आहे.