त्या नागरिकांविरोधात पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- महापालिकेचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च होतो. तुलनेत पाणीपट्टी वसूल हाेत नाही. नगर शहरात साधारण अधिकृत नळ जोडणीची संख्या अंदाजे ६५ हजार इतकी आहे. अधिकृत नळधारकांकडून दरवर्षी पाणीपट्टी वसूल केली जाते.

परंतु, अनधिकृत नळ धारकांना पाणीपट्टी वसूल होत नाही. त्यामुळे महापालिकेची पाणी योजना वर्षानुवर्षे तोट्यात आहेत. मात्र आता अनधिकृतपणे पाणी भरणाऱ्यांविरुद्ध पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

नगर शहरातील अनधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबिवण्यात येत आहे. पूर्वीचा दंड न आकारता चालू पाणीपट्टी भरून नळ अधिकृत करून दिले जाणार असून, त्यासाठी ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली जाणार आहे.

दिलेल्या मुदतीत नळ अधिकृत न केल्यास संबंधित नागरिकांविरोधात पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्याबाबत नागरिकांना वेळावेळी कळविण्यात आले होते.

परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. मागील दंड भरावा लागेल, या भीतीने नागरिकही नळ जोड अधिकृत करून घेत नाहीत. यावर पाणीपुरवठा विभागाकडून आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

यामध्ये दोन महिन्यांत नळ जोडणी अधिकृत केल्यास त्यासाठीची रक्कमही निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार नागिरकांना पाणीपट्टी भरून अनधिकृत नळ अधिकृत घेण्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

ऑगस्टपर्यंत नळ अधिकृत न करणाऱ्यांकडून दंड आकारला जाईल. त्यानंतर जे नळ अनधिकृत आढळून येतील, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.