Relationship Tips In Marathi : पार्टनर ‘परफेक्ट ‘च हवा, हा हट्ट पडू शकतो महाग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Relationship Tips In Marathi :- आपला जोडीदार कसा असावा याचं एक अस्पष्ट असं चित्र प्रत्येकाच्या डोक्यात असतं. त्याची एक पक्की चौकट अनेकांना आखलेली असते. आणि भेटणारी प्रत्येक व्यक्ती मनातल्या त्या चित्राशी पडताळून बघितली जाते.

त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो.आणि दुर्दैवाने बहुतांश वेळा भेटलेली व्यक्ती त्या चित्रासारखी नसते, त्या चौकटीत बसेल अशीही नसते.

आणि समजा जरी त्या चित्रचौकटीत बसली तरी साध्या साध्या गोष्टीसुद्धा जर त्या व्यक्तीने मनाप्रमाणे केल्या नाहीत, तर राग येऊ लागतो आणि हे फार घातक असतं.

» आपला जोडीदार कसा असावा ह्याचं चित्र बरेच वेळा अस्पष्ट असतं त्यामुळे मग कुठेतरी ट्रायल अँण्ड एरर पद्धतीने मुले-मुली पुढे चालत राहतात. बदललेल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे हे जमतंही. पण ह्यातही एक जण नात्यात अडकत गेला आणि दुसरा जर मी फक्त चान्स घेऊन पाहत होतो असं म्हणत असेल तर गोष्टी खूप गुंतागुंतीच्या होऊन जातात.

» आपण आपल्या जोडीदाराचे मनात रेखाटलेले चित्र, मग भले ते तर्कशुद्ध विचार करून असेना का, ते चित्र म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, आता ठरले म्हणजे ठरले असा विचार न करता लवचिक राहिले पाहिजे.

आपल्यातला कोणीही अगदी परफेक्ट नाही, आपल्याला काय हवंय ते शंभर टक्के कोणीच परफेक्ट मांडू शकत नाही. आपली बुद्धिमत्ता मर्यादित आहे.

अनुभव ही मर्यादितच असतात. लवचिकता म्हणजे ठाम नसणे नव्हे, तर ठाम  राहूनही मेंदूचे दरवाजे उघडे ठेवणे असते. एखादा निर्णय घेतल्यावरही मेंदूचे दरवाजे उघडे ठेवले तर इतरांचे  अनुभव, इतरांचं ज्ञान  आपल्याला मदत करू  शकतं.

» लवचिक नसू तर आपण आपल्याच विचारांच्या चौकटीत अडकून राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. केवळ जोडीदार निवडण्याच्या बाबतीच नाही तर एकूणच जगताना लवचिकता ठेवता आली तर मनस्ताप कमी होतो. स्थिर विचार करायला मदत होते.

» आपण रोज अनेक गोष्टी बघत असतो, वाचत असतो, अनुभवत असतो. आणि म्हणूनच आपल्या विचारात आणि मनातल्या ठरलेल्या गोष्टींत बदल करणे म्हणजे च स्वत:च्याच विचारांच्या पुनर्तपासणी काम करणं आवश्यक असतं.

» लग्न करण्याची इच्छा असलेले किंवा नसलेले सर्वच जण परफेक्ट पार्टनर शोधण्याची सतत धडपड करत असतात. आपल्यापकी कोणीच परफेक्ट नसतो, कोणीही आदर्श नसतो.

हे माहीत असलं तरी व्यवहारात ते विसरलं जातं. स्वप्नात जगणं चुकीचं नसतं, चुकीची असते ती दुसऱ्याला आपल्या परफेक्ट या व्याख्येत बसवण्याची धडपड.

आपण लाख प्रयत्न केले तरी दुसरा आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही किंबहूना तसा वागावा अशी इच्छा असणे चुकीचे आहे. कारण दुसरी व्यक्ती ही एक स्वतंत्र माणूस असते. त्याला आदर्श करण्याच्या भानगडीत पडू नका.