अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- गतवर्षी शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांची मदत मिळाली असून नुकसान मात्र ४०० कोटींचे झाले आहे. निसर्ग व लॉकडाऊन या दुहेरी खाईत तालुक्याचे आर्थिक चक्र सापडल्याने अनेकांची परिस्थिती डबघाईत आली.

वर्षानुवर्षे पावसाअभावी अथवा अतिवृष्टी अशा संकटाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ठरले. पावसाळ्यापूर्वी मशागती करून पाऊस होताच बि-बियाणे, खते खरेदी, पेरणी या उद्योगांशी बांधील असणारा शेतकरी मागील वर्षी किती नुकसान झाले, याचा कधीच विचार करीत नाही.

शेती हा आपला परपंरागत व्यवसाय आहे. त्यावरच आपण जगतो आणि जगवतो. या विश्वासाने त्याचे ऋूतुचक्र चालूच असते. असह्य परिस्थितीत दरवर्षी काळ्या आईची रात्रदिंवस काबाडकष्टाने ओटी भरणारा शेतकरी निसर्ग लहरीने अद्याप पुरेपुर सुखी होऊ शकला नाही.

शासन नावालाच शेतकऱ्यांच्या सहानभुतीवर आहे. पावलोपावली त्यांच्या मदतीचा दाडोंरा पिटला जातो. प्रत्यक्षात मात्र, त्याची पिळवणूक करून तो सतत रडता असावा यासाठी प्रयत्न केले जातात. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना भरभरून मदतीच्या घोषणा होतात.

पंरतु देताना हात आखडता घेतला जातो. नुकसान आणि मदत याची तुलना केल्यास मोठी तफावत असते. फुल ना फुलाची पाकळी समजून तो मदत घेत असला तरी नुकसानीचे दुःख त्याला बोचत राहते.

सन २०२० व २०२१ चे नुकसान पाहता. शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ११५ गावांतील ५६ हजार ३८० शेतकऱ्यांना ४४ हजार ३०३ बाधित क्षेत्रासाठी ४४ कोटी ५१ लाख ४२ हजार ५०६ रुपये मदत देण्यात आली. प्रत्यक्षात हे नुकसान ४०० कोटींच्या आसपास झाल्याचा अंदाज आहे.