शेतकऱ्यांनो खते आणि बियाणे शासनमान्य दुकानातून खरेदी करा अन् पक्कं बिल घ्यायला विसरू नका, कृषी विभागाचे आवाहन

खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. पक्के बिल घेणे आवश्यक असून फसवणुकीपासून बचावासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना दिली आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीत व्यस्त आहेत. या काळात बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी अहिल्यानगरच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शासनमान्य आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी करण्याचे आणि पक्के बिल घेण्याचे आवाहन केले आहे. 

यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल आणि दर्जेदार निविष्ठा मिळण्याची खात्री होईल. कृषी विभागाने यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांनी काटेकोरपणे पाळाव्यात.

शासनमान्य परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी

खरीप हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, बियाणे आणि खतांच्या खरेदीत फसवणूक होण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. काही अनधिकृत विक्रेते किंवा फेरीवाले निकृष्ट दर्जाची बियाणे आणि खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय पिकांचे उत्पादनही घटते. 

याला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना शासनमान्य परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी खरेदी करताना पक्के बिल घ्यावे आणि ते हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे, जेणेकरून काही तक्रार असल्यास पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकेल.

खरेदी करतांना पक्कं बिल घ्या

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काही विशेष खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाने सुचवले आहे. शेतकऱ्यांनी शासनमान्य विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे आणि बियाण्याची पिशवी किंवा पाकीट सीलबंद असल्याची खात्री करावी. शक्यतो बियाणे सातबारा धारकाच्या नावाने खरेदी करावे, ज्यामुळे खरेदीचा व्यवहार अधिक पारदर्शक होईल. खतांच्या खरेदीतही शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार खताची मात्रा ठरवावी. संयुक्त खतांऐवजी सरळ खतांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण यामुळे पिकांना आवश्यक पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात. खरेदीचे पक्के बिल घेणे आणि ते जपून ठेवणे यावर विशेष भर देण्यात आला आहे, कारण फसवणुकीच्या प्रकरणात हे बिल महत्त्वाचा पुरावा ठरू शकते.

कृषी विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

कीटकनाशकांच्या खरेदीतही शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे कृषी विभागाने नमूद केले आहे. शेतकऱ्यांनी एका वेळी फक्त आवश्यक तेवढ्याच कीटकनाशकांची खरेदी करावी आणि फवारणी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत फेरीवाल्यांकडून किंवा अनधिकृत दुकानांमधून बियाणे, खते किंवा कीटकनाशके खरेदी करू नये, कारण अशा खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. जर शेतकऱ्यांना खरेदी दरम्यान लिंकिंग किंवा इतर कोणत्याही गैरप्रकारांचा अनुभव आला, तर त्यांनी तात्काळ नजीकच्या कृषी विभागाशी किंवा कृषी विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण केले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!