राज्यातील तरुणांसाठी आंनदाची बातमी ! १५,५०० पदांसाठी लवकरच मेगा भरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- पुण्यातील स्वप्निलच्या आत्महत्येनंतर MPSC च्या तरूणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता विधिमंडळ अधिवेशनातही विरोधी पक्ष भाजपाने या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं.

त्यानंतर आता राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.

गट अ ते क पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

भरणे यांनी सांगितले की, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.

तसेच गट अ ४ हजार ४१७ पदे, गट ब ची ८ हजार ३१ पदे आणि गट क ची ३ हजार ६३ पदे अशी एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यास वित्त विभागाने सन २०१८ पासून मान्यता दिलेली आहे.

त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची ४ रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील असं मंत्री भरणे यांनी म्हटलं.