Maharashtra News : यंदा अत्यल्प पावसामुळे हिरव्या चाऱ्यांबरोबर पाणी टंचाईला सामोरे जात असताना वाढत्या उन्हापासूनही जनावरांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. लसीकरणासोबतच विविध आजार उद्भवल्यास तातडीने डॉक्टरची मदत घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांच्या खाद्यात बदल होतो. मिळेल ते खाद्य जनावरांना दिले जाते. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यासह दूध उत्पादनावर होतो. सूर्यप्रकाशाच्या तडाख्याने कातडीचे आजार होतात. उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही. त्यामुळे उन्हाच्या झळा लागून उष्माघाताचे प्रकार होऊ शकतात. तापमानाने चाळिशी ओलांडल्याने गाय, म्हैस, बैल, शेळी आदी प्राण्यांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
उष्माघाताची लक्षणे
जनावरांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरेनाइट इतके वाढून कातडी कोरडी पडते. श्वासोच्छवासाचा वेग वाढून धाप लागल्यासारखे होते. जनावरांना आठ तासानंतर अतिसार होतो. त्यामुळे जनावरे बसू लागतात. लघवीचे प्रमाण कमी होते. जनावरांची तहान, भूक मंदावते. पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे चक्कर येतात.
उपाययोजना
जलावरांना थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. सावलीत अथवा थंड ठिकाणी बांधावे. हलके, पाचक गुळमिश्रित खाद्य द्यावे. शिंगामध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर थंड पाणी शिंपडत राहावे.
उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी
जनावरांना तीन ते चार वेळा थंड पाणी पाजावे. आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. दुपारच्या वेळी विशेषः उन्हात मोकळे सोडू नये. गोठ्यामध्ये अधूनमधून पाणी फवारावे. रात्री व पहाटे वाळलेली वैरण द्यावी.
उन्हाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूत व फऱ्या यासारख्या रोगाची लागण होत असते. त्यामुळे रोगप्रतिबंधक लस योग्यवेळी टोचून घ्यावी. दुभत्या जनावरांबरोबर वासरे, कालवडी, भाकड जनावरे यांचीही विशेष काळजी घ्यावी.