सप्तशृंगगड : ज्यांनी या जगात आणले,वाढविले त्या वडिलांनाच फसवल्याची हृदयद्रावक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे.
‘तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे, त्यासाठी सप्तशृंगगडावर जायचे आहे’, असे सांगून राहुरी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वृद्ध पित्याला सप्तशृंगगडावर आणले आणि त्याना गडाच्या पहिल्या पायरीजवळच बसण्यास सांगून स्वत: तेथून पोबारा केला.
हा धक्कादायक प्रकार मंदिर ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्यामुळे उघडकीस आला. दरम्यान या दुर्दैवी पित्यास सध्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वृध्दाश्रमात ठेवण्यात आले आहे.
स्वत:च्या दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला दीडशे किमी दूर नेऊन त्याला एकटेच निराधारपणे सोडून त्याचा पोटचा मुलगा पलायन करतो, यावर वरवर विश्वास बसत नसला, तरी हे सत्य आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी, सप्तशृंगगडाची पहिली पायरी. दुपारी साधारण २ ची वेळ. नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी.
त्याच गर्दीच्या घोळक्यात मळकट-फाटके कपडे नेसलेले, अंगाने बारीक, विस्कटलेले केस अशा वर्णनाचे एक दृष्टिहीन वयोवृद्ध डोळ्यांतून आसवे गाळत बसलेले होेते.
तत्पूर्वी या वयोवृद्धाने काठीचा आधार घेत आणि जागेचा अंदाज घेत हा सावलीचा आधार शोधला होता. दिवसभर त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नव्हते.
रात्री आठच्या सुमारास गर्दी विरळ झाल्यानंतर हा वृध्द तेथे तशाच अवस्थेत बसून असल्याचे सुरक्षा कर्मचारी पंडित कळमकर यांना दिसले.
त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्या वयोवृद्धाने आपले नाव किसन कपालेश्वर वायाळ (वय ६५, म्हेसगाव, नगर) असल्याचे सांगितले.
‘माझ्या मुलाने मला माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे, असे खोटे सांगून येथे आणले. आणि मी परत येईपर्यंत कुठेही न जाण्यास सांगितले.
दुपारी १ ते २ वाजेपासून तो परतलाच नाही. सुनबाईच्या कटकटीला कंटाळून आपला मुलगा येथे मला एकट्याला सोडून निघून गेला’ अशी आपबिती किसन यांनी सांगितली.
त्यानंतर कळमकर यांनी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना याबाबत माहिती दिली. दहातोंडे यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला.
संबंधित मुलगा आपले वडील हरविल्याची कदाचित खोटी तक्रार दाखल करेल, असे सांगून त्याला ताब्यात घेण्याची विनंती दहातोंडे यांनी पोलिसांना केली.
त्यानंतर दहातोंडे, कळमकर, ज्ञानेश्वर सदगीर, इम्रान शाह, संतोष पाटील, पोलीस कर्मचारी ब्राह्मणे यांनी वायाळ यांना घेऊन नांदुरी येथील सप्तशृंगी वृद्धाश्रम गाठले. वृद्धाश्रमाचे अध्यक्ष गंगा पगार यांना सर्व हकीकत सांगून किसन यांना त्यांच्या स्वाधीन केले.
मंदिर ट्रस्टचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल किसन वायाळ यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले.