अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेड ‘च्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बोठे गेल्या महिन्याभरापासून फरार आहे.
पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असली तरी त्यांना अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान बोठेचा शोध घेण्यासाठी आता आक्रमक पाऊले उचलली जाऊ लागली आहे.
याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षसक मनोज पाटील यांनी माहिती दिली आहे. बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांना ‘स्टँडिग वॉरंट’ हवे आहे. त्यासाठी पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. असे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यात आणि अन्य राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. पोलिसांनी बोठेचा ४० ठिकाणी शोध घेतला.
नगर जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यांतही पोलिस जाऊन आले. मात्र तो मिळू शकलेला नाही. पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागलेले आहेत. तसेच अनेकांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. सर्व माहिती पारनेर न्यायालयात अर्जासोबत देण्यात आली आहे.
पोलिसांचा हा अर्ज मंजूर झाला तर आरोपीला पकडण्याचे काम वेगाने होऊ शकते. न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला,
त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात. दरम्यान, या अगोदर पोलिसांनी जरे यांच्या घराची तीन-चार वेळा झडती घेतली आहे. यामध्ये बरीच माहिती आणि पुरावे ठरतील अशा गोष्टी पोलिसांच्या हाती आल्या आहेत.