लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते.

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 11वी बैठक संपन्न झाली. बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,

गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने,

सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) जितेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव मो.बा. कुलकर्णी, आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

परिवहन मंत्री ॲड.परब म्हणाले, अपघातामुळे निष्पाप लोकांचा जीव जातो आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडते. घरातला एखादा कर्ता व्यक्ती मृत्यु पावल्यास त्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक अवस्था काय होते ही आपल्याला कल्पना आहे.

त्यामुळे लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची संकल्पना असली पाहिजे. यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर गठीत केलेल्या समित्यांनी वारंवार आढावा घेऊन राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे.

रस्ते सुरक्षेसाठी कायद्याच्या धाकाबरोबरच प्रबोधनाची सुद्धा गरज आहे. यासाठी प्रमुख महामार्गावर वेगाची मर्यादा दर्शविणारे फलक, गतिरोधक, अपघात ठिकाणाची माहिती, वळण असलेल्या रस्त्याची माहिती असे माहिती फलक असले पाहिजे. अपघातामध्ये होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.

अपघात झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. त्यासाठी आरोग्य यंत्रणेनी सहकार्य करावे. ग्रामीण भागामध्ये ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे रेडियमच्या पट्ट्या दर्शनी भागावर असाव्यात अशा सूचना करून महाराष्ट्रातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ॲड.परब यांनी यावेळी केले.

अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले, गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघाताची संख्या कमी झाली तरी ती समाधानकारक नाही. ही संख्या कमी दिसत असली तरी मृत्यू आणि जखमींची संख्या अधिक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना करुन शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शिस्त,

नियमांचे पालन, संवेदना, सुरक्षितता आणि कारवाई यातून वाहनचालकांची मानसिकता अनुकुल करुन सकारात्मक मानसिकतेकडे नेले पाहिजे आणि चांगले वाहनचालक तयार होतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

यासाठी एक वेबपोर्टल तयार करण्यात यावे. यावर झालेल्या रस्ते अपघातांविषयी माहिती, अपघाताचे प्रकार, ठिकाण, अपघाताची वेळ, नेमके कारण याची माहिती स्थानिक समितीने त्यावर दिली पाहिजे.

जिथे अपघात झाला त्याठिकाणी जावून स्थानिक प्रशासनाने संबंधित विभागाला अपघाताचे कारण कळविले पाहिजे, अशा सूचनाही श्री.सिंह यांनी यावेळी केल्या.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागाचे आणि सेव्ह लाईफ फांऊडेशन, परिसर या सेवाभावी संस्थेने सादरीकरण केले.