हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश : रोहित पवारांचा टोला

Maharashtra News:वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय आरोपप्रात्यारोप सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खोचक टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या रुपया आणि डॉलरसंबधीच्या एका विधानाचा आधार घेत ‘हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे, असा टोला आमदार पवार यांनी लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

’ रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे.

गुजरात विधानसभेची निवडणुक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातला नेले जात आहेत. यामुळं ती निवडणूक भाजपा कदाचित जिंकेलही परंतु या खेळात महाराष्ट्राच्या युवांचं भवितव्य चिरडलं जातंय आणि सर्वच राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत आहेत, हे दुर्दैव आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.