file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी उपस्थित पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींसह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मोहटे गावात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील मोहटा गावातील हनुमान मंदीरासमोर काही लोकांनी एकत्र येवून मिरवणूक काढली. मिरवणुकीत बँड व इतर वाद्य वाजवून 50 ते 100 लोकांची गर्दी जमवली.

सदर गर्दी काढण्यासाठी पोलीस गेले असता आरोपी महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे हे पोलिसांना म्हणाले आम्ही येथून जाणार नाही व कोणालाही जाऊ देणार नाही.

तुम्ही आम्हाला कोण आडवणार, असे म्हणून चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी महादेव दहिफळे यास पकडून ठेवले.

मात्र घटनास्थळी जमलेल्या इतर दहा ते पंधरा व्यक्तीने विठ्ठल दहिफळे यास पळून जाण्यास मदत केल्याने तो पळून गेला. यानंतर चव्हाण

यांनी महादेव दहिफळे व विठ्ठल दहिफळे यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या दहा ते पंधरा जणांविरोधात कोविडच्या नियमांचे पालन न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.