Hyundai Share Price:- आजच्या बाजारात ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरने जोरदार उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. भारतीय शेअर बाजारात एकीकडे आरबीआयचा महत्त्वाचा निर्णय चर्चेचा विषय ठरला, तर दुसरीकडे ह्युंदाईच्या शेअरने गेल्या काही महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली. दोन्ही घटनांनी शेअर बाजारात एक सकारात्मक ऊर्जा दिली.
ह्युंदाई मोटर इंडियाचा शेअरची कामगिरी कशी?
ह्युंदाई मोटर इंडियाचा शेअर सोमवारी तब्बल ६.८% ने वाढला आणि बीएसईवर १,९८६.६० रुपयांवर पोहोचत नवीन विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२४ मध्ये या शेअरची नोंदणी १,९७० रुपयांवर झाली होती. आज सकाळपासूनच शेअरमध्ये व्यवहाराला गती मिळाली. दुपारी १२:२० पर्यंत सुमारे ९० हजार शेअर्सची उलाढाल झाली आणि त्यातून जवळपास १८ कोटी रुपयांची खरेदी-विक्री झाली. बाजार बंद होण्याच्या आधी, २ वाजून ९ मिनिटांनी, हा शेअर ४.०६% वाढीसह १९३५.८० रुपयांवर स्थिरावला.

या किंमत वाढीमागील कारणे काय?
या वाढीमागे एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे व ती म्हणजे रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट कपात करण्याचा निर्णय. आरबीआयने आपली चलनविषयक धोरणे जाहीर करताना ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली, जी अनेकांसाठी अनपेक्षित होती. यामुळे बँकांचे कर्ज स्वस्त होईल, गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये घट होईल. परिणामी, वाहन खरेदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ह्युंदाईसारख्या कंपन्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर, ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक वाहन विभागातही एक सकारात्मक चित्र उभं राहिलं आहे. इक्विरस सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, मे २०२५ मध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ५५ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. ह्युंदाईच्या ई-क्रेटा आणि इतर नवीन मॉडेल्समुळे कंपनीचा ईव्ही क्षेत्रातील वाटा मे २०२४ मधील २.६ टक्क्यांवरून मे २०२५ मध्ये ४.१ टक्क्यांवर पोहोचला. आता भारतात टाटा मोटर्सच्या पाठोपाठ ह्युंदाईही आघाडीच्या खेळाडूंमध्ये समाविष्ट झाली आहे.
फक्त वाहन उत्पादन नव्हे, तर हरित ऊर्जा क्षेत्रातही कंपनीने पावलं टाकली आहेत. ह्युंदाईने अलीकडेच FPEL TN विंड फार्म प्रायव्हेट लिमिटेड या अक्षय ऊर्जा प्रकल्पात २६.१३ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी १६५.८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याच योजनेअंतर्गत, नोव्हेंबर २०२४ मध्ये करण्यात आलेल्या करारानुसार, ह्युंदाई एकूण ३८०.५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.