MPSC Success Story : शेतकऱ्यांची पोरं कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. आता शेतकरी पुत्र फक्त शेतीतच निपुण आहेत असं राहिलेल नसून स्पर्धा परीक्षांमध्ये देखील शेतकरी पुत्रांचा बोलबाला कायम आहे.

मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या लेकाने आपल्या अपार कष्टाच्या जोरावर एमपीएससीत घवघवीत यश संपादन केला आहे. यामुळे सध्या या शेतकरी लेकाची चर्चा रंगली आहे. एमपीएससी मार्फत जुलै मध्ये घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेची अंतरिम निवड यादी बुधवारी प्रसिद्ध झाली.

यामध्ये लाडसावंगी येथील अक्षय दिवाणराव पडूळ याचा यादीत समावेश आहे. या शेतकऱ्याच्या लेकान सर्वांना मागे सारत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान आपल्या नावावर केला आहे. निश्चितच अक्षयने शिक्षणात ताकद असते हे दाखवून दिलं आहे. अक्षय यांनी सांगितले की, सातत्याने अभ्यास केला आणि अंगात मेहनत घेण्याची ताकद असली तर काहीही शक्य होऊ शकतं.

खरं पाहता ग्रामीण भागातील नवयुवक तरुणांना स्पर्धा परीक्षेचे मोठे वेड असतं. ग्रामीण भागातील नवयुवक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकतात देखील. अक्षय देखील बुधवारी प्रसिद्ध झालेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या यादीत चमकले असून मानाचे अव्वल स्थान ग्रहण करून इतरांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.

आपल्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की, विक्रीकर निरीक्षक या पदाची जाहिरात २०२१ मध्ये एमपीएससीच्या माध्यमातून प्रकाशित झाली होती. तेव्हापासून राज्यातील लाखो नवयुवक तरुण डोळ्यात एक तेजस्वी स्वप्न घेऊन या परीक्षेसाठी अहोरात्र गाभारकष्ट करत होते. यामध्ये अक्षयचा देखील समावेश होता.

जुलै २०२२ मध्ये विक्रीकर निरीक्षक या पदाची मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेची बुधवारी अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ६०९ जणांचा समावेश होता. या 609 उमेदवारांपैकी म्हणजेच अधिकाऱ्यांपैकी अक्षयच यश नेत्रदीपक ठरलं कारण की अक्षयने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

निश्चितच अक्षयने आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर सातत्याने अभ्यास करत त्यांनी पाहिलेलं एक स्वप्न सत्यात उतरवून दाखवल आहे.