अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- सराफ व्यावसायिकाने नोकराकडे बँकेत भरण्यासाठी दिलेली ३० लाखांची रोख रक्कम व कारागीराकडे देण्यासाठी दिलेले ७५ ग्रॅम सोने घेऊन नोकर पसार झाला आहे.

याप्रकरणी संतोष सोपान बुराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ अनिल केरुळकर याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुराडे यांनी बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी केरुळकर याला घरी बोलावून घेत त्याच्याकडे ३० लाख रुपयांची रोकड देऊन बँक उघडल्यानंतर आरटीजीएसद्वारे पायल गोल्ड यांच्या पुण्यातील बँक खात्यात जमा करण्यासाठी सांगितले.

तसेच पुणे येथील सोन्यामारुती चौक येथील दागिने तयार करणाऱ्या कारागिराकडे देण्यासाठी ७५ ग्रॅम सोने दिले, तो निघून गेल्यानंतर बुराडे यांनी बराच वेळ त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याचा मोबाईल बंद होता. त्याच्या घरीही बुराडे यांनी संपर्क साधला. मात्र, तो घरी नव्हता. पुण्यातील व्यापार्‍याकडेही त्यांनी माहिती घेतली. तेथेही तो पोहचला नाही.