भारतीय सैन्याची ताकद वाढवण्यासाठी आता लवकरच एक अत्याधुनिक विमान भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे, ज्यामुळे शत्रूंच्या मनात भीती निर्माण होणं निश्चित आहे. ‘आय-स्टार’ नावाच्या या प्रकल्पामुळे भारतीय हवाई दलाची (IAF) क्षमता केवळ वाढणार नाही, तर ती जागतिक स्तरावर पोहोचेल. पाकिस्तान आणि चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांसाठी ही बातमी नक्कीच धक्कादायक ठरू शकते.
‘आय-स्टार’ विमान

या गुप्तचर विमानाची खासियत म्हणजे त्याची बहुउद्देशीय कार्यक्षमता. या विमानाच्या मदतीने भारतीय सैन्य हवेतून शत्रूच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवू शकेल आणि कोणतीही संशयास्पद कृती त्वरित ओळखू शकेल. सीमा भागांमध्ये होणारी प्रत्येक छोटी मोठी घडामोड आता याच्या प्रगत सेन्सर्सच्या रडारवर असेल. यात बसवलेले इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्टर, पाळत ठेवणारी उपकरणे, आणि अत्याधुनिक विश्लेषण प्रणाली यामुळे हे विमान अक्षरशः हवेत उडणारं हेरगिरीचं केंद्र बनणार आहे.
रडार प्रणाली, क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळं, शत्रूंची हालचाल, तैनात युनिट्स आणि अगदी गुप्त तळसुद्धा या विमानाच्या नजरेआड राहणार नाहीत. हे विमान शत्रूच्या लष्करी तंत्रज्ञानावर सतत नजर ठेवून, त्यावरील अचूक माहिती थेट भारतीय सैन्यापर्यंत पोहोचवेल, कारण या विमानाचं डेटा नेटवर्क अत्यंत जलद आणि विश्वसनीय आहे.
कसा असेल नवीन प्रोजेक्ट?
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 10,000 कोटी रुपये आहे, आणि सुरुवातीला तीन ‘आय-स्टार’ विमाने भारतीय हवाई दलात दाखल केली जातील. विशेष बाब म्हणजे ही विमाने पूर्णपणे भारतातच विकसित केली जात आहेत. या प्रकल्पासाठी DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) तांत्रिक उपकरणं, सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर स्वदेशी पातळीवर तयार करणार आहे. विमानाच्या मुख्य प्लॅटफॉर्मसाठी बोईंग, बॉम्बार्डियर आणि एअरबससारख्या कंपन्यांना विचारात घेतलं जातंय.
असे प्रकल्प केवळ तंत्रज्ञानात भारताला स्वावलंबी करत नाहीत, तर देशाच्या सामरिक सुरक्षिततेला अधिक बळकट करतात. ‘मेक इन इंडिया’ या धोरणांतर्गत हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, कारण त्याने केवळ भारताच्या सीमांचं संरक्षण वाढेल असं नाही, तर जागतिक संरक्षण बाजारात भारताचा दर्जाही उंचावेल.