रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून रेल्वेचे तिकीट दर वाढणार, जाणून घ्या नव्या दरांची यादी

Published on -

भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. 1 जुलै 2025 पासून रेल्वेने अधिकृतपणे भाडेवाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. देशभरात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात आणि या निर्णयाचा त्यांच्यावर थेट परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, सामान्य प्रवाशांपासून ते तात्काळ बुकिंग करणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी काही महत्त्वाचे बदल रेल्वेने जाहीर केले आहेत.

नवीन दर

नवीन भाडेवाढीचा सर्वात मोठा फटका मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना बसणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, नॉन-एसी मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ करण्यात येणार आहे. तर एसी कोचसाठी ही वाढ प्रति किलोमीटर 2 पैसे अशी असेल. हे दर 1 जुलैपासून लागू होतील. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात ही वाढ अधिक जाणवेल.

गोंधळ टाळण्यासाठी रेल्वेने स्पष्ट केले आहे की सामान्य द्वितीय श्रेणी प्रवाशांसाठी 500 किमीपर्यंत भाडेवाढ होणार नाही. मात्र, जर प्रवास 500 किमीपेक्षा जास्त असेल, तर प्रति किलोमीटर अर्धा पैसा अधिक द्यावा लागणार आहे. शहरात रोज ट्रेनने जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मासिक सीझन तिकिटाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. शहरी रेल्वे सेवा पूर्ववतच राहणार आहे.

तात्काळ तिकीटसाठी नवीन नियम

याशिवाय, तात्काळ तिकीट बुकिंगसाठीही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून IRCTC च्या वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे तात्काळ तिकिट बुक करताना आधार प्रमाणीकरण बंधनकारक असणार आहे. रेल्वेने स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेचा उद्देश तात्काळ योजनेचा गैरवापर थांबवणे आणि सामान्य नागरिकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे हा आहे.

इतकंच नाही, तर 15 जुलैपासून एक पाऊल पुढे जात रेल्वेने तात्काळ बुकिंगसाठी आधार-आधारित OTP पडताळणी देखील अनिवार्य केली आहे. म्हणजेच, केवळ आधार क्रमांक पुरेसा नसेल, तर मोबाईलवर आलेला OTP टाकूनच बुकिंग पूर्ण करता येईल.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी सर्व झोनल कार्यालयांना परिपत्रकाद्वारे यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. हे बदल लागू झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वे प्रवासात अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण अनुभवायला मिळणार आहे. मात्र, याचबरोबर, किरकोळ प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना या वाढलेल्या भाड्यामुळे खर्चात वाढ जाणवणार हेही तितकंच खरे आहे.

थोडक्यात सांगायचं तर, 1 जुलैनंतर रेल्वेने प्रवास करण्याआधी तुमचं बजेट आणि आधार कार्ड दोन्ही तपासून बघावं लागणार आहे. कारण रेल्वेचा प्रवास आता थोडा महाग, पण थोडा अधिक नियोजित होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!