शाळा आहे की आलीशान महाल? वर्षांची फिस 1 कोटी 13 लाखांपेक्षाही अधिक; ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी शाळा!

Published on -

शिक्षण हे माणसाचे भविष्य घडवते, असं आपण मानतो. पण जगात काही शाळा अशाही आहेत जिथं शिक्षण केवळ गुणवत्तेचं नसून ऐश्वर्याचंही प्रतीक आहे. अशाच एका शाळेची चर्चा सध्या पुन्हा एकदा होतेय. कारण तिचं नाव ‘जगातील सर्वात महागडी शाळा’ असं मानलं जातं. ही शाळा म्हणजे इन्स्टिट्यूट ले रोझी, जी स्वित्झर्लंडमध्ये वसलेली एक खासगी बोर्डिंग स्कूल आहे.

ले रोझी स्कूल

 

ले रोझी ही शाळा केवळ तिच्या वार्षिक फीमुळेच चर्चेत नाही, तर तिच्या अनोख्या परंपरांमुळेही लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरते. या शाळेतील शिक्षणासाठी पालकांना जवळपास 1.13 कोटी रुपये मोजावे लागतात.

ही रक्कम एका वर्षाची फी आहे, आणि त्यामध्ये शिक्षणाबरोबरच निवास, खाणं, विविध उपक्रम, खेळ आणि इतर अनेक सुविधा समाविष्ट आहेत. अर्थात, सामान्य कुटुंबातील व्यक्तीसाठी हे एक स्वप्नच ठरेल.

शाळेची स्थापना 1880 मध्ये पॉल-एमिल कॉर्निल यांनी केली होती. ही शाळा चक्क 14 व्या शतकातील चाटेउ डू रोझी या ऐतिहासिक वास्तूत सुरू करण्यात आली होती. आजही शाळेचा कॅम्पस हा त्या पारंपरिक फ्रेंच किल्ल्याच्या सौंदर्याशी सुसंगत असून, त्याला आधुनिकतेची जोड दिली आहे. विशेष म्हणजे, ही जगातील एकमेव अशी शाळा आहे जी हंगामानुसार आपला कॅम्पस बदलते. म्हणजे, हिवाळ्यात संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग गस्टाड या स्की रिसॉर्ट भागात स्थलांतर करतो, तर उरलेल्या वर्षात ते रोले गावातील कॅम्पसमध्ये राहतात.

शाळेतील विद्यार्थी संख्या सुमारे 400 च्या घरात आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे वय 14 ते 18 वर्षे यामध्ये असते. एका वर्गात केवळ 20 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याने शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष असते. यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत वैयक्तिक आणि दर्जेदार शिक्षण मिळतं. याखेरीज, इथे फ्रेंच आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं, आणि द्विभाषिक, द्विसांस्कृतिक शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो.

ले रोझी शाळेची खास वैशिष्ट्ये

ले रोझीच्या खास वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे इथे एकाच देशातून फक्त 10% विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे इथलं वातावरण अत्यंत आंतरराष्ट्रीय असतं, जे विद्यार्थ्यांना विविध संस्कृती आणि विचारसरणी समजून घेण्याची संधी देतं. यामुळंच इथे शिकलेले विद्यार्थी केवळ परीक्षांमध्ये नव्हे, तर जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!