क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायचीये? फायदे होणार की फसवणूक?, पूर्ण माहिती येथे मिळेल!

Published on -

आजकाल क्रेडिट कार्ड प्रत्येकाच्या खिशात असतो, पण त्याचा वापर कोण किती शहाणपणाने करतो, हेच आर्थिक शिस्तीचं खऱ्या अर्थानं प्रतिबिंब असतं. अनेकजण क्रेडिट कार्डची मर्यादा म्हणजे जितका जास्त खर्च करता येईल तितकं चांगलं, असं समजतात. पण खरंतर ही मर्यादा वाढवताना आपण भान ठेवणं फार गरजेचं आहे. कारण हे कार्ड जितकं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, तितकंच ते तुमचं आर्थिक गणितही बिघडवू शकतं.

क्रेडिट कार्डची मर्यादा म्हणजे तुम्ही त्या कार्डावरून किती रक्कम खर्च करू शकता याची कमाल सीमा. ही लिमिट वाढवणे म्हणजे तुमच्याकडे अधिक खर्च करण्याची ताकद येते, पण त्याचवेळी तोटा आणि कर्जाचं जाळंही जवळ येतं. जर ही लिमिट केवळ ऑफर किंवा आकर्षणामुळे वाढवली, तर आपण न जाणता स्वतःला आर्थिक संकटात ढकलू शकतो.

काय फायदे मिळतात?

तरीही, योग्य नियोजन आणि आर्थिक जबाबदारी असेल, तर लिमिट वाढवण्याचे काही फायदे जरूर आहेत. उदाहरणार्थ, कमी युटिलायझेशन रेशोमुळे तुमचा CIBIL स्कोअर सुधारतो, तुम्हाला भविष्यात कर्ज घेणं सोपं जातं, आणि अनेकदा बँक ऑफर करत असलेल्या रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक किंवा डिस्काउंट्सचा फायदा घेता येतो. ही वाढलेली मर्यादा आपत्कालीन खर्चासाठीही उपयोगी पडू शकते.

मात्र दुसरीकडे, खर्चाच्या सवयी जर सैल असतील, तर लिमिट वाढवणं म्हणजे आपल्याला अनावश्यक खरेदीचं निमंत्रण देणं ठरतं. महिन्याच्या शेवटी हे बिल भरताना मानसिक आणि आर्थिक ताण येऊ शकतो. जर वेळेवर पूर्ण बिल भरलं नाही, तर त्यावर दरमहा मोठं व्याज लागू लागतं. अनेक महिने फक्त किमान रक्कम भरत राहिलात, तरी मूळ थकबाकी तशीच राहते. त्यात जर एखाद्या वेळी कार्डमधून थेट पैसे काढले, तर तिथेही लगेच व्याज आणि शुल्क आकारलं जातं.

काय लक्षात ठेवाल?

अशा वेळी काही गोष्टी कायम लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. वेळेवर बिल भरणं, किमान रक्कम न भरता पूर्ण थकबाकी देणं, क्रेडिट कार्डच्या फक्त 30-40% मर्यादेचाच वापर करणं, आणि कार्डमधून पैसे काढण्यापासून शक्यतो टाळणं. तसेच प्रत्येक खरेदीसाठी ईएमआय निवडणंही टाळावं, कारण त्यातून हळूहळू कर्जाचा डोंगर तयार होतो.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेकजण जुनं कार्ड बंद करून नवीन घेतात. पण हे करताना लक्षात ठेवा, जुनं कार्ड हे तुमच्या आर्थिक शिस्तीचा पुरावा असतं. जास्त काळ क्रेडिट वापरल्याचा अनुभव स्कोअर सुधारण्यात मदत करतो. म्हणून, गरज नसताना जुनं कार्ड बंद करणं टाळावं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!