स्वयंपाकघर म्हणजे घराचा तो कोपरा, जिथे फक्त अन्न शिजवले जात नाही, तर घरातील प्रेम, आपुलकी आणि एकजुटीचे धागेही बांधले जातात. आणि या जागेचं पावित्र्य जपण्यासाठी अनेक घरांमध्ये एक चित्र शांतपणे आपली उपस्थिति जपून असतं, ते म्हणजे देवी अन्नपूर्णेचं. स्वयंपाकघरात हे चित्र लावण्यामागे केवळ धार्मिकता नाही, तर एका खोल भावनेची आणि अध्यात्मिक आस्थेची कहाणी आहे.

पौराणिक कथा
हिंदू संस्कृतीत अन्न हे केवळ उपजीविकेचं साधन नसून, ते ब्रह्म मानलं जातं आणि अन्नाची देवता म्हणजे माता अन्नपूर्णा. घरात अन्न कधीही कमी होऊ नये, ही भावना मनात घेऊन प्रत्येक भक्त तिची उपासना करत असतो. तिची मूळ कथा पुराणांमध्ये आढळते, जिथे भगवान शिव आणि पार्वती यांच्यात अन्नाचं महत्त्व काय, यावरून वाद होतो. भगवान शिव अन्नाला माया म्हणतात, तर पार्वती अन्नाशिवाय जीवन शक्य नाही, असं सांगतात. आणि त्यानंतर पार्वती अन्नाचं अस्तित्वच संपवते. या घटनेनंतर संपूर्ण जग उपासमारीला सामोरं जातं आणि तेव्हा माता अन्नपूर्णा प्रकट होऊन काशी नगरीत अन्न वाटू लागते. या घटनेनंतर ती अन्नाची प्रमुख देवी म्हणून पूजली जाऊ लागली.
स्वयंपाकघर म्हणजे जिथे अन्नाची निर्मिती होते, म्हणूनच अन्नपूर्णेचं चित्र तिथे असणं केवळ एक श्रद्धेचा भाग नाही, तर आंतरिक विश्वासाचं प्रतीक आहे. असे मानले जाते की तिचा आशीर्वाद असलेलं घर कधीही अन्नाच्या किंवा संपत्तीच्या कमतरतेला सामोरं जात नाही. जेवण बनवताना तिच्या चित्राकडे पाहून मनात भक्ती आणि कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो. त्या भावनेतून बनवलेलं अन्न केवळ चविष्टच नव्हे, तर सात्विक आणि आरोग्यदायक असतं.
अन्नपूर्णा देवीचा फोटो का लावतात?
तिचं चित्र स्वयंपाकघरात असणं म्हणजे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासारख्या शक्तींचंही अप्रत्यक्ष स्मरण करणं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कुटुंबात सलोखा वाढतो आणि अन्नातही सात्त्विकता आणि पवित्रता राहते. याशिवाय अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आर्थिक समृद्धी, समाधान आणि नात्यांमध्ये एक बंध तयार होतो.
काशीमधील अन्नपूर्णा मंदिर हे तिच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. असे मानले जाते की ती आजही काशीमध्ये राहते आणि भक्तांना अन्न आणि कृपा दोन्ही देते. स्वयंपाकघरात तिचं चित्र लावणं म्हणजे त्या पवित्र मंदिराशी आध्यात्मिक नातं जोडणं, आणि आपल्या कुटुंबासाठी तिच्या आशीर्वादाची मागणी करणं.
या सगळ्या भावनिक आणि अध्यात्मिक पैलूंमुळे, अन्नपूर्णेचं चित्र स्वयंपाकघरात असणं ही केवळ एक परंपरा नाही, तर ही एक श्रद्धेची ओळख आहे.