Ahmednagar Politics : आ. आशुतोष काळे विखेंच्या जवळीकतेनंतर आता मंत्रिपद ! अजित दादांना मुख्यमंत्री करू म्हणताच विखे गटाची सावध पावले..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सध्या आ. आशुतोष काळे हे आमदार आहेत. ते अजित पवार गटात सामील झालेले आहेत. निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर काही राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. त्यात आ. आशुतोष काळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात जवळीकता वाढणे हे देखील महत्वाचे राजकीय समीकरण जुळले. आता आमदार काळेंच्या गळ्यात मंत्रिपद पडणार अशी चर्चा आहे.

कारण त्यांना मंत्री करण्याचे सूचक वक्तव्य अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी स्वतः केले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा संपन्न झाला. यामध्ये युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी यासह सूतोवाच केले.

दरम्यान यावेळी युवकांनी अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पाहाण्यासाठी कामाला लागा अशा सूचना व घोषणा देताच मात्र आता विखे-पाटील गट सावध झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मेळाव्यास आमदार डाॅ. किरण लहामटे, नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, डाॅ. मच्छिंद्र बर्डे आदींसह नेतेमंडळी उपस्थित होती.

काय म्हणाले सूरज चव्हाण

मागील वर्षी अनेक घडामोडी घडल्या. परंतु त्यावेळी काळे हे परदेशात होते. ते जर त्यावेळी असते तर आजची परिस्थिती वेगळी असती पण आता भविष्यात त्यांना मंत्रिपद मिळेल असे संकेत सूरज चव्हाण यांनी दिले. ते म्हणाले, 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना आला होता व त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला होता.

यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर व नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेअरिंगबाज भूमिका घेतल्याने आमदार आशुतोष काळे यांना कोपरगावमध्ये विकासकामांना गती देता अली आहे. असे म्हणत त्यांनी आगामी काळात त्यांना मंत्रिपद मिळेल असे सांगण्यात येत आहे.

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणा अन विखे पाटील गट सावधान !

या युवक मेळाव्यात अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचे पाहायचे असल्याने कामाला लागा, लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अजित दादांचे हात बळकट करा असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान या घोषणेनंतर विखे गट सावध झाला असल्याचे म्हटले जाते. याचे कारण असे की, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भाजपकडून मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी काळात समीकरणे बिघडली तर त्यांचे स्वप्न पुन्हा अधुरे राहील अशी चर्चा लोक करत आहेत.