Ahmednagar Jilha Sahkari Bank : अहमदनगर हा महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी अशी ओळख आहे. मात्र, सहकाराच्या याच पंढरीतल्या जिल्हा सहकारी बँकेचा सध्याचा कारभार हा सर्वसामान्यांना विचलित करणारा ठरत आहे. खरे तर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे.
यामुळे गेल्या काही काळापासून जिल्हा बँके संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. अशातच आता जिल्हा बँकेसंदर्भात एडवोकेट प्रतापराव ढाकणे यांनी मोठे भाष्य केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूठभर कारखानदारीमुळे अडचणीत आली असून कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते, असा आरोप ढाकणे यांनी केला आहे. खरेतर, काल 20 सप्टेंबर 2024 ला शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
यावेळी बोलताना ढाकणे यांनी जिल्हा बँके संदर्भात हे विधान केले आहे. म्हणजे ढाकणे यांनी ही बँक कधीही बुडू शकते असा आरोप केला आहे. ढाकणे यांनी, ही बँक शेतकऱ्यांच्या मालकीची आहे.
पण, या बँकेची अवस्था आज काय आहे हे लवकरच जनतेला कळणार आहे. ही बँक जिल्ह्यातील मुठभर चार-पाच कारखानदारांची नाही. ही बँक बुडाली तर शेतकर्यांना कर्ज देणाऱ्या सोसायट्या अडचणीत येतील आणी जिल्ह्यातील शेतकरी डबघाईला येणार आहेत, असं विधान यावेळी केले आहे.
खरेतर एडवोकेट ढाकणे यांचे हे आरोप गंभीर आहेत. यामुळे गेल्या काही काळापासून बँकेच्या गलथान कारभाराबाबत आणि गैरप्रकाराबाबत ज्या बातम्या समोर येत आहे अशा सर्व प्रकरणात सहकार विभागाकडून योग्य ती कारवाई होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.