Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुशंघाने अहमदनगरमध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. शरद पवार गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आदींनी जिल्ह्यात मेळावे, आढावा बैठका घेत पुढील रणनीती आखण्याचा दृष्टीने प्रयत्न केले आहेत.
दरम्यान आता माजी आ. शिवाजी कर्डीले यांच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मनात नेमके काय सुरु आहे अशी चर्चा सध्या नागरिकांत सुरु आहे. ते भाजपमध्येच राहतील की अजित पवार गटात जातील? श्रीगोंद्यात उभे राहतील की राहुरीत उभे राहतील आदी प्रश्न नागरिकांना पडलेत.
भाजप की अजित पवार गट ? श्रीगोंदे की राहुरी ?
माजी आ. शिवाजी कर्डीले हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु सध्या ते वेगवेगळी राजकीय गणिते आखताना दिसतायेत. ते राहुरी मतदार संघातून मागील वेळी उभे होते. त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांना पुन्हा येथूनच लढायचे असेल तर संधी कशी मिळेल हा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे सध्या महायुतीमध्ये अजित पवार आहेत.
ही जागा राष्ट्रवादीने जिंकली असल्याने येथे त्यांचा दावा राहील. आता दुसरीकडे ते श्रीगोंदेतही चाचपणी करत असल्याचे म्हटले जात आहे. येथे भाजपची जागा आहे येथे त्यांना भाजपमधून तिकीट मिळू शकते. परंतु येथील आमदारकीवरचा दावा आ.पाचपुते सोडतील का असाही प्रश्न आहे. तसेच दावा जरी सोडला व कर्डीले भाजपकडून उभेही राहिले तरी येथे अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादीचीही ताकद मोठीआहे.
यातील काही मातब्बर विधानभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते महायुतीचा धर्म किती पाळतील अशी सांशकता असल्याची चर्चा आहे. राहुरीतून उभे राहायचे तर अजित पवार गटात जावे लागेल, श्रीगोंदेतून उभे राहायचे असले तरी अजित दादांची ताकद लागेल. त्यामुळेच बहुतेक त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.
माजी आ. कर्डीले राहुरीतून राष्ट्रवादीकडून उभे राहतील?
माजी आ. कर्डीले राहुरीतून राष्ट्रवादीकडून उभे राहतील का अशीही चर्चा आहे. कारण खासदार सुनील तटकरे यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राहुरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळे सक्षम उमेदवार देत राष्ट्रवादी अजित पवार गट राहुरीमध्ये आपला उमेदवार देणार आहे. राहुरीतही राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देणार असल्याचे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह माझी भेट घेतल्याचा खुलासा खा. तटकरे यांनी केला होता. त्यामुळे येथे कर्डीले राहुरीतून राष्ट्रवादीकडून उभे राहण्याचा एक पर्यायही वापरला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे आत नेमके काय घडेल हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल.