Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा व शिर्डी या दोन मतदार संघात लोकसभेची जय्यत तयारी झाली असून प्रचारही शिगेला पोहोचला आहे. अद्याप पर्यंत अहमदनगरमध्ये २० उमेदवारी अर्ज गेल्याची माहिती समजली आहे.
आणखी देखील अर्ज जाऊ शकतात व लोकसभेच्या आखाड्यात सहा ते सात उमेदवार उभे होऊ शकतात असा अंदाज आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा आजवरचा इतिहास जर पाहिला तर अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघातून २७३ उमेदवारांनी लोकसभेत जाण्यासाठी आपली नशीब अजमावून पाहिले आहेत.
परंतु २०१ उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आल्याचा इतिहास आहे. डिपॉझिट जप्त होणाऱ्यांमध्ये विविध पक्षांच्या ६३ उमेदवारांचा, तर १४८ अपक्षांचा समावेश आहे.
किती असते डिपॉझिट व ते का जप्त होते?
आता सध्याचा विचार करता लोकसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील जागेसाठी २५ हजार रुपये, तर राखीव जागेच्या मतदारसंघासाठी १२ हजार पाचशे रुपये एवढे डिपॉझिट आहे. ही रक्कम निकालानंतर उमेदवारास पुन्हा दिली जाते.
पण त्यासाठी झालेल्या मतदानापैकी एक षष्ठांश मते (१६.६६ टक्के) मिळणे आवश्यक असते. एवढी मते न मिळाल्यास निवडणूक आयोगाकडून डिपॉझिट जप्त करण्यात येते. १९५१ ते २०१९ पर्यंत सतरा लोकसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यात प्रामुख्याने कम्युनिस्ट,
समाजवादी, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत झाल्याचे दिसून येते. दोन्ही मतदारसंघांतून २७३ उमेदवारांमधून ३४ खासदार झाले. २०१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. ३८ उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आले.
पक्षीय उमेदवार, अपक्ष व मातब्बर खासदारांचाही समावेश
डिपॉझिट जप्त होणाऱ्यांमध्ये ६३ पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. भाजप, बसप, सीपीआय, जनता दल, जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, आप या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
तर या पक्षांच्या उमेद्वारांव्यतिरिक्त १४८ अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. तसेच तीन खासदारांवर देखील नामुष्की ओढवली आहे.
खासदार राहिलेले पंढरीनाथ कानवडे १९६७ च्या निवडणुकीत दक्षिणेतून अपक्ष लढले यावेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. २००९ मध्ये तुकाराम गडाख बसपच्या तिकिटावर लढले मात्र,
त्यांना डिपॉझिट वाचवता आले नाही. २०१९ ला भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष उभे होते. त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले होते.