सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

सरकारमध्ये आला आहात आता राज्याच्या समस्या तरी सोडवा, असा खोचक सल्लाही अजित पवारांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘भूकंप-भूकंप करणाऱ्यांनी राज्य ताब्यात घेतलंय ना, ते आता व्यवस्थित चालवा. ज्या समस्या आहेत, त्या सोडवा. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आणि एवढं बहुमत मिळूनही समाधान झाले नाही का? अजून किती मोठी भूक आहे, ते तरी एकदा कळू द्या’, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती, ती छाताडावर की कुठेतरी दगड, धोंडा ठेऊन भागवली आहे ना? बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता, म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला, असा सणसणीत टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.