‘मातोश्री’वरुन बोलवणे आले तर जाऊ पण…; बंडखोर आमदाराची अट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी  :  शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर आता ‘मातोश्री’वर जाण्याबाबत मौन सोडले आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वरुन फोन आला तर जाऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी देखील असे वक्तव्य केले आहे.

आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला ‘मातोश्री’वर बोलवावे, असे सुहास कांदे म्हणाले आहेत. बुधवारी शिर्डीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ, मात्र एकटे जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना बोलावलं तरच आम्ही सर्व एकत्र मातोश्रीवर जाऊ’, असे सुहास कांदे यांनी सांगितले आहे.

आमची खदखद ही संजय राऊतांवर नव्हती तर विकास कामांबाबत होती. ज्या ४० आमदारांच्या मतांवर संजय राऊत खासदार झाले त्यांनाच राऊतांनी ‘रेडा’, ‘डुक्कर’ असे म्हटले, असे सांगत सुहास कांदे राऊतांविषयीची नाराजी व्यक्त केली आहे.