Sanjay Raut : आता संजय राऊतांचा लेटरबॉम्ब, भाजप आमदाराच्या कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? राज्यात खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अनेकांवर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. असे असताना आता पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या संबंधीत आहे. यामुळे आता चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करत आज राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या, असाही सल्ला खासदार राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, सोमय्या यांच्या कार्यालयात तक्रारदार हे प्रकरण घेऊन गेले, मात्र किरीट सोमय्या या भ्रष्टाचारावर मूग गिळून गप्प बसले. जनतेच्या पैशाची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण हे सरळसरळ ५०० कोटींचे मनी लॅंडरींग असल्याचा आरोप केला आहे.

यामुळे आता चौकशी केली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे, मात्र या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. का कारखाना सुरू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत देखील केली होती. यामुळे चौकशी होणार का हे लवकरच समजेल.