Sanjay Raut : हक्कभंगाच्या नोटीसला संजय राऊतांचे उत्तर, आता हक्कभंग समितीवरच घेतला आक्षेप…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चर्चेत आले आहेत. अनेकदा त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. यामुळे संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी केली होती.

नंतर सरकारने संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीही स्थापन केली. त्यांनी विधीमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहून हक्कभंग समितीतील सदस्यांवरच आक्षेप घेतला आहे. यामुळे आता त्यांची चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले, हक्कभंग समितीतील सदस्य तटस्थ असावेत. तसेच या समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या पत्रात ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त, बेकायदेशीर व संपूर्णतः घटनाबाह्य सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे.

सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. हक्कभंग कारवाईबाबत समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते.

असे असताना या समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते. हे लोकशाहीला धरून नाही. मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे. या चोरमंडळातील सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.