“जो पक्षाचा अन् पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत संजय राऊत”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ‘जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत मी असतो. संजय राऊत नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही’, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय घेतले आहेत. शेषन, प्रणब मुखर्जी, प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला आहे. आता निर्णय घेण्याचे सर्वाधिकार ठाकरेंना आहेत. जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो त्याच्यासोबत संजय राऊत असतात, राऊत नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, सर्व खासदार मागे उभे राहतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यापासून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे पडसाद जाणून घेण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेनेच्या १९ लोकसभा खासदारांपैकी १२ जण उपस्थित होते, तर ७ खासदार अनुपस्थित राहिले. तर राज्यसभेवरील तिघा खासदारांपैकी दोघे जण हजर होते. जवळपास तीन तास ही बैठक सुरु होती.