Shrigonda News : उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक उलटल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढती कशा असतील हे क्लिअर झाले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता प्रचाराला देखील लागले आहेत. अशातच, मात्र श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीने जाहीर केलेला उमेदवार बदलण्यासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. महायुतीने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट दिले आहे.
त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. पण, विद्यमान आमदार पाचपुते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते या आपल्या लेकाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत.
यामुळे पक्षाने प्रतिभा पाचपुते यांचे नाव फायनल केल्यानंतर बबनराव पाचपुते सपत्नीक मुंबईला पक्षश्रेष्ठीं सोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. मात्र मुंबईत गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा पाचपुते यांनाच उमेदवारी मिळणार असे जाहीर केले.
मात्र आज बबनराव पाचपुते यांच्या माऊली या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांच्या या बैठकीत विक्रमसिंह पाचपुते यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान कार्यकर्त्यांच्या या मागणीवर विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आपण कार्यकर्त्यांच्या या भावना वरिष्ठ नेत्यांना नक्कीच कळवणार आणि योग्य तो निर्णय घेणार असे सांगितले.
दरम्यान, उमेदवार बदलावर पक्षाने निर्णय घेतला असून भाजप तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्ध पत्रक काढून या जागेवर भाजपकडून विक्रमसिंह पाचपुते हे निवडणूक लढवणार असे जाहीर केले असल्याची माहिती हाती आली आहे.
खरे तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी प्रतिभा पाचपुते यांच्या समवेत विक्रम सिंग पाचपुते यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला होता. दरम्यान आता पक्ष विक्रम सिंह पाचपुते हे निवडणूक लढवणार असे जाहीर करणार असल्याने प्रतिभा पाचपुते हे उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहेत.
यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव पाचपुते हाच आमचा पक्ष आणि ते सांगतील तोच उमेदवार अशा भावना व्यक्त करत ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते जो उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणू असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.
उमेदवारी बदलाबाबत विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यकर्त्यांच्या आपण निवडणूक लढवावी अशा भावना आहेत, आता या भावना वरिष्ठांना कळविल्या जाणार आहेत आणि येत्या दोन-तीन दिवसात या संदर्भात निर्णय होईल अशी माहिती दिली आहे.
खरेतर, आमदार बननराव पाचपुते यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. आमदार बबनदादांचे आजारपण आहे. आईला उमेदवारीसाठी कसरत करणे शक्य नाही. यात बबन दादांचे हाल होतील. असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
एकंदरीत आमदारकीमुळे बबन दादांचे हाल होतील, म्हणून आमदार होऊन तुमचे हाल नकोत, विकी दादांची जबाबदारी आम्ही घेतो अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आता कार्यकर्त्यांच्या या भावना अन कौटुंबिक अडचण पाहता विकी दादा हे श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचा गड लढतील असे बोलले जात आहे.