Shrigonda Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील लढती आता क्लिअर झाल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र राज्यातील अनेक मतदारसंघात बंडखोरीचे प्रमाण वाढलेले आहे.
महायुती अन महाविकास आघाडी दोन्ही गटात बंडखोरी झाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदरसंघाबाबत बोलायचं झालं तर येथील लढत सुद्धा आता स्पष्ट झाली आहे.
या मतदारसंघात एकूण 31 उमेदवारांनी अर्ज भरला होता. पण यापैकी अनेकांनी आता आपला अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातील 15 उमेदवारांनी कालपर्यंत आपले अर्ज मागे घेतलेत.
म्हणजे आता या जागेवर 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महत्वाचे म्हणजे काल भाजपच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी सुद्धा आपला अर्ज मागे घेतलाय. तसेच, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार घनश्याम शेलार यांनीही आपला अर्ज मागे घेतलाय.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप आणि महायुतीमधील भाजपच्या नेत्या सुवर्णा पाचपुते यांनी मात्र आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरेल असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.
खरंतर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचे बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. येथून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर आमदार झाले आहेत.
अर्थातच या मतदार संघात बबन दादा पाचपुते यांना मानणारा एक मोठा गट आहे. यामुळे पाचपुते यांना त्यांच्याच बालेकिल्लात टक्कर देणे म्हणजे फारच कठीण काम आहे.
शिवाय यावेळी महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी झाली असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आता येथे चांगलाच जोर लावावा लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी मध्ये झालेली बंडखोरी पाचपुते कुटुंबासाठी फायदेशीर ठरणार आहे.
प्रतिभा पाचपुते यांची माघार विक्रम दादा राहणार महायुतीचे उमेदवार
महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आली आणि पक्षाने विद्यमान आमदार बबनदादा पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना पंधरा दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती.
पण, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते हे त्यांचे सुपुत्र विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. यासाठी त्यांनी जोरदार फील्डिंगही लावली होती.
पक्षश्रेष्ठींकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला होता. पण पक्षाने ऐनवेळी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा पाचपुते आणि विक्रम पाचपुते दोघांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, सौ प्रतिभा पाचपुते तसेच पाचपुते कुटुंबाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विक्रमदादा यांनाचं उमेदवारी मिळायला हवी अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात होती.
प्रतिभा पाचपुते यांनी तर उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही विक्रम दादा यांना उमेदवारी मिळाली नाही तर आपण निवडणुकीतून माघार घेणार अशी भूमिका जाहीर केली.
यानुसार काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिमा पाचपुते यांनी निवडणुकीतून माघार घेतली. अर्थातच आता विक्रम पाचपुते हेच महायुतीचे उमेदवार राहणार आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाने अजित पवार गटातून आलेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे आता महायुतीकडून विक्रम पाचपुते, महाविकास आघाडी कडून अनुराधा नागवडे, अपक्ष म्हणून राहुल जगताप आणि सुवर्णा पाचपुते यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे.