सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला : आमदार हेमंत ओगले

Published on -

१२ मार्च २०२५ श्रीरामपूर : शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, व्यापारी व उद्योजकांसह सर्वसामान्य जनतेचे काहीच घेण देणं नसलेला हा अर्थसंकल्प असून, लाडक्या बहिणींना देखील या सरकारने फसवले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका आमदार हेमंत ओगले यांनी केली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाच्या हमी भावाबाबत घोषणा नाही,शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा पण फसवी निघाली.

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता, सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यावर आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे.अर्थमंत्र्यांच्या भाषणात मेट्रो उड्डाणपूल भुयारी मार्ग, विमानतळ, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यांचाच बोलबाला आहे, पण राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या मुलभूत समस्या सोडवण्याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण नाही.

आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी बद्दल एक शब्दही नाही.शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा पोकळ ठरली.आजही शेतकऱ्यांना वसुलीसाठी वीजबिले पाठवली जात आहेत.शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले, पण अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे कृषी क्षेत्रामुळे विकास दर वाढला, पण सरकारने शेत मालाला भाव दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सरकारने जाहीर केलेले प्रकल्प, गुंतवणूक ही फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या भागापुरताच असून, राज्याचा मोठा भाग विकासापासून वंचितच आहे. महाराष्ट्रात बेरोजगारांच्या फौजा आहेत. त्यांच्या हाताला नोकरी नाही. राज्य सरकारची अडीच लाख रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी काहीच धोरण नाही अशा प्रकारे हा अर्थसंकल्प नसून, ही एक बनवाबनवी असल्याचे टीका आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe