पुणे : मशिदींवरच्या भोंग्यावरून मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत, असे स्पष्ट केले आहे.

या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र शांतपणे भूमिका मांडली असून देशात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याला बाली पडू नका, असे आवाहन केले आहे.

अजित पवार म्हणाले, सर्व जातीधर्मात एकोपा राहावा, कोणत्याही धर्मात तेढ निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच इतर देशांत जसे श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशात काय चालले आहे, याचा विचार करा. आपला मोठा देश एकोप्याने राहावा, याचा प्रयत्न सर्वांनी करावा, हे संविधानात (constitution) सांगितले आहे. त्याचा अवलंब करावा, असे ते म्हणाले. सध्या राज्यात, देशात काहीजण जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका. जातीय वादंगाचा सर्वाधिक फटका हा गरिबांना बसतो, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदमध्ये (press conference) बोलताना मशिदींवरचे भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. हे भोंगे माणुसकीच्या नात्याने काढावेत. ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत. त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

तसेच राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल, असे ते म्हणाले. तर आमच्या प्रार्थनेला विरोध कराल, तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.