अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन लाठ्या-काठ्या कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे पिंपळे कुटुंबियांकडून आयोजन करण्यात आले होते.

त्या दरम्यान पूर्वीच्या वादामधून वडाळा महादेव येथील बबन कमलाकर पिंपळे यांना औरंगाबाद येथील नातेवाईकांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली.

पिंपळे यांच्या वस्तीवर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना औरंगाबाद येथून आलेल्या अंदाजे 24 ते 25 व्यक्तींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यकमासाठी उपस्थित असलेल्या महिला पुरुष तसेच लहान मुले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यास सुरुवात केली.

यावेळी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सदर व्यक्तींनी कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून पिंपळे वस्ती येथील अनिल बबन पिंपळे तसेच राजु गंगाधर चव्हाण या व्यक्तींना शस्त्राचा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. पोलिसांनी संबंधित गुन्हेगार यांना वडाळा महादेव येथील ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायत चौकामध्ये जेरबंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.