अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील वाकडी येथे एका विहिरीत 22 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर मृतदेह हा येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकाच्या सुन सुजाता उर्फ डल्ली प्रकाश सुनार (नेपाळ) असे नाव असल्याचे समजते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रकाश सुनार (मुसीकोट नगरपालिका, ता. जि. रुकुम नेपाळ) हा येथीलच हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतो.

येथील श्री खडेराय देवस्थानच्या सुरक्षा रक्षक म्हणून प्रकाशचे वडील काम बघतात. प्रकाशची पत्नी व वडील हे वाकडी येथील देवस्थानच्या रूममध्ये राहतात. दि. 13 रोजी सुजाताला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले होते.

रात्री 2 च्या सुमारास मृत सुजाता ही देवस्थानच्या बाथरुमकडे गेली असता ती परत आली नाही म्हणून तिची नणंद व सासरे हे बघण्याकरिता गेले असता विहिरीच्या जवळ चप्पल आढळून आली.

याबाबत माहिती समजताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर गळाच्या साह्याने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात यश आले.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत सुजाताने 5 दिवसापूर्वीच एका नवजात बालकाला जन्म दिला आहे.