Soybean Bajarbhav : शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांनी बळीराजा भरडला जात आहे. यावर्षी देखील बळीराजाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.

यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर असताना झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मित्रांनो यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

निसर्गाशी झुंज देत शेतकरी बांधवांनी कसाबसा सोयाबीन उत्पादित केला. मात्र आता बाजारात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत व्यापारी वर्गांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.

सोलापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना देखील या समस्येचा सामना करावा लागत आहे. सोलापूर तालुक्या प्रमाणेच इतरही ठिकाणी शेतकऱ्यांची अशी पिळवणूक होत असेल असा अंदाज बांधला जात आहे. व्यापारी सोयाबीनची आद्रता चेक करून खरेदी करत आहेत आणि यामुळे शेतकरी बांधवांची फसवणूक होत असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकरी बांधवांच्या मते सुरुवातीला 10 मोईश्चर आलं की सोयाबीनला 5000 चा दर मिळत होता मात्र आता आता तीन ते चार हजाराचा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात असून ही सर्रास शेतकऱ्यांची लुटमार माजवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, किती मोईश्चरला किती दर याबाबत बाजार समितीमध्ये कोणतेही फलक अथवा माहिती पुस्तिका देण्यात आलेली नाही.

यामुळे व्यापारी जो दर सांगेल त्या दरात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन विकावा लागतो. एकंदरीत सोयाबीनच्या बाजारावर कुणाचाच अंकुश नसल्याचे चित्र आहे. यामुळे व्यापारी वर्ग चांगलाच मालामाल होत असून शेतकरी बांधवांची पिळवणूक होत आहे. यामुळे बाजार समिती प्रशासनाने सदर बाबींवर गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे.

मित्रांनो खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सोयाबीन वरील स्टॉक लिमिट काढून घेतले. त्यामुळे सोयाबीन दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी व्यापाऱ्याकडून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची लूट होत असल्याने वाढीव दराचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार हा मोठा प्रश्न आहे.