अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे.

वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले तरी शेतकऱ्यांना बाजारात द्राक्षाला कवडीमोल दर मिळतो परिणामी द्राक्ष उत्पादकांना फटकाच बसतो.

मात्र या विपरीत परिस्थितीमध्ये देखील अहमदनगर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनी आपल्या कष्टाच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कायमच विक्रमी आणि दर्जेदार असे उत्पादन घेऊन दाखवल आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील एका द्राक्ष बागायतदारानेही हवामान बदलाचा सामना करत द्राक्षाचे चांगले दर्जेदार उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतकरी अनिल गडाख यांनी यावर्षी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून 125 रुपये प्रति किलोचा भाव मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांची द्राक्ष बांगलादेशला पोहचली आहेत.

खरं पाहता हिवरगाव पावसा हे गाव डाळिंब उत्पादनासाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखलं जात होतं. मात्र तेल्या रोगामुळे या गावाची डाळिंब उत्पादनाची ओळख पुसली गेली. अनेकांना या रोगामुळे आपल्या डाळिंब बागा काढाव्या लागल्या. अशा परिस्थितीत या गावातील बहुतेक शेतकरी आता द्राक्ष शेतीकडे वळले आहेत. अनिल यांनी देखील आपल्या दोन एकर शेत जमिनीवर द्राक्षाची लागवड केली आहे.

दरम्यान द्राक्ष लागवड केल्यानंतरही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांना अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, जास्तीची थंडी या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला तर अनेकदा या हवामान बदलाचा सामना करून चांगले द्राक्ष पिकवले तर बाजारात कवडीमोल दर मिळाला. मात्र यावर्षी त्यांनी चांगले दर्जेदार द्राक्ष पिकवले असून बाजारात दर देखील समाधानकारक मिळाला आहे.

सहा जानेवारी रोजी अनिल यांच्या द्राक्षाची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. द्राक्ष उत्तम दर्जाची असल्याने थेट बांगलादेशला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी पाच ते सहा टन माल काढला गेला. विशेष म्हणजे अनिल यांच्या या द्राक्ष बागेत गेल्या काही दिवसांपूर्वी गुडघाभर पाणी होते. यामुळे द्राक्ष बाग वाचणार नाही असं चित्र होत.

मात्र त्यांनी हिंमत न हारता आपल्या द्राक्ष बागेचे योग्य व्यवस्थापन केले. शेवटी हिम्मतीलाच किंमत मिळाली आणि आज त्यांना द्राक्ष बागेतून चांगली कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच अनिल यांनी द्राक्षे शेतीमध्ये केलेली ही कामगिरी ईतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी सिद्ध होणार आहे.