Crop Damage Compensation : दिलासादायक! ‘या’ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 76 कोटींचा निधी प्राप्त, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Damage Compensation : महाराष्ट्रात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देखील जाहीर करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील चार तालुक्यातील 92 हजार 737 अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 76 कोटी 39 लाख 80 हजार रुपयाचा निधी शासनाकडून प्रशासन दरबारी प्राप्त झाला आहे. आता हा निधी तालुका निहाय अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.

निश्चितच जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील परभणी सेलू पाथरी आणि पूर्णा या चार तालुक्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे वावरात उभी असलेली पिके पाण्याखाली गेली. ऐन वाढीच्या अवस्थेत कोसळलेला हा पाऊस पिकांसाठी मोठा मारक ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले.

अशा परिस्थितीत या चार तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. या अनुषंगाने त्या चार तालुक्यात सर्वेक्षण केले गेले. सर्वेक्षणाअंती तालुक्यातील 92,737 बाधित शेतकऱ्यांचे 56,175 हेक्टरवरील शेतीपिकाचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 76 कोटी 39 लाख 80 हजार रुपये अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जावी असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठवण्यात आला.

यानंतर अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरण करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. शासन निर्णयानंतर आता जवळपास दोन महिन्यांनी हा निधी प्रत्यक्षात परभणी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. साहजिकच निधी उपलब्ध होण्यास अधिक वेळ लागला आहे मात्र उशिरा का होईना यामुळे शेतकऱ्यांना दिलासा लाभला आहे.

दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिरायती पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. एकंदरीत परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ची मदत प्राप्त झाली असल्याने शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा लाभणार आहे.