Explained : पारनेर पंचायत समिती निवडणूक : खासदार निलेश लंकेंना किंममेकर होण्याची संधी

Published on -

Explained Parner Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग सक्रिय झालं आहे. निवडणूकीत गट व गणांच्या फेररचनेबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे गणपती की दिवाळी? निवडणूका नक्की कधी, असा सवाल विचारला जात आहे. राजकारणाच्या बाबतीत सर्वात हाँट व अनपेक्षित निकाल देणारा तालुका म्हणून पारनेर ओळखला जातो. पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नेमकं काय होईल? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

सुरुवातीला काँग्रेस मग कधी कम्युनिष्ट, त्यानंतर शिवसेना, मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस व आता व्यक्ती केंद्रीत व व्यक्ती विरोधात राजकारण सुरु झालेला पारनेर तालुका या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. सध्यातरी या तालुक्यात खा. निलेश लंके विरोधात इतर सर्व असेच चित्र आहे. लोकसभेला खा. निलेश लंके यांच्यामागे उभ्या राहिलेल्या या तालुक्याचे राजकारण विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा बदलले. लंके गट, माजी आ. विजयराव औटी गट, सुजीत झावरे गट या प्रमुख नेत्यांभोवती आत्तापर्यंत या तालुक्याचे राजकारण फिरत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून माजी नगराध्यक्ष विजय औटी, आ. काशिनाथ दाते व सुजय विखे गटानेही या तालुक्यातील राजकारणात आपली हक्काची वोट बँक तयार केल्याने प्रत्येक निवडणुकीत रंगत येताना दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी झालेल्या पारनेर बाजार समितीत निवडणुकीत या तालुक्याने लंके- औटी ही ऐतिहासिक युती पाहिली. परंतु ती जास्त काळ टिकली नाही. लोकसभेला माजी आ. विजयराव औटी यांनी विखे गटाला सपोर्ट केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत माजी आ. विजयराव औटी यांनी थेट अपक्ष लढत लंके यांना यांना शह दिला. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीला निलेश लंके याच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना व सुजय विखे गट एकत्र आला. ज्या तालुक्याच्या जोरावर निलेश लंके खासदार झाले त्याच तालुक्यात त्यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभव पहावा लागला. ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते हे पहिल्यांदा आमदार झाले. निलेश लंके विरोधात इतर सर्व या प्लॅनिंगमुळे हे शक्य झाले. दाते सरांच्या विजयात सुजय विखे यांचा जेवढा वाटा होता, तेवढाच माजी नगराध्यक्ष विजय औटी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांचा वाटा राहिला. लोकसभेला सुजय विखेंचा पराभव होऊ शकतो हे जसं नगर जिल्ह्याने पाहिलं, तसंच लंके यांचाही पराभव होऊ शकतो हे विधानसभा निवडणुकीने दाखवलं.

आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानसभेला पत्नीचा झालेला पराभव निलेश लंके यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पारनेर पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी त्यांची व्यूव्हरचना सुरु झाली आहे. दुसरीकडे विधानसभेत विजय मिळविल्यानंतर लंके विरोधकांच्या एकीलाही नजर लागल्याचे चित्र आहे. आ. दाते हे एकला चलो रे च्या भुमिकेत दिसत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात विखेंनी लक्ष घालून पुन्हा लंके विरोधक एकत्र केले तर, पंचायत समितीवर लंके विरोधकांचा झेंडा फडकू शकतो असे चित्र आहे. गेल्या वेळी पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत या गट व गणांची तोडफोड झाली. आता पारनेर तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यावेळी सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणांत निवडणूक होणार आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या तालुक्यातील गट व गणाचे आरक्षण नेमके कसे होते ते आपण पाहू…

पारनेर जिल्हा परिषद गट आरक्षण
1. ढवळपुरी- अनुसूचित जमाती
2. टाकळी ढोकेश्वर- सर्वसाधारण पुरुष
3. कान्हुर पठार- ओबीसी महिला
4. निघोज- सर्वसाधारण पुरुष
5. जवळा- सर्वसाधारण
6. सुपा- सर्वसाधारण

पारनेर पंचायत समिती गणांचे आरक्षण

1. रांजणगाव मशिद- अनुसूचित जाती
2. भाळवणी- अनुसूचित जमाती
3. वासुंदे- ओबीसी
4. वाडेगव्हाण- ओबीसी महिला
5. सुपा- ओबीसी महिला
6. टाकळी ढोकेश्वर- सर्वसाधारण महिला
7. वडझिरे- सर्वसाधारण महिला
8. जवळा- सर्वसाधारण महिला
9. कान्हुर पठार- सर्वसाधारण महिला
10. ढवळपुरी- सर्वसाधारण व्यक्ती
11. आळकुटी- सर्वसाधारण
12. निघोज – सर्वसाधारण

गेल्यावेळी पारनेर पंचायत समितीत शिवसेनेचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसचे 2 असे सदस्य निवडून आले होते. निकाल त्रिशंकू लागल्यानंतर सभापतीपदासाठी चांगलाच घोडेबाजार रंगला. पंचायत समिती सदस्यांची पळवापळवी झाली. अखेर सभापतीपदासाठी शिवसेनेचे गणेश शेळके यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीपदासाठी निलेश लंके गटाच्या सुनंदा धुरपते यांची 6 विरुद्ध 4 मतांनी निवड झाली होती. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. उपसभापति असलेल्या सुनंदा धुरपते यांनी सभापतीपदासाठीही अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रोहिणी काटे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले होते. कर्जुले हर्या गणाच्या शिवसेनेच्या सदस्या सरुबाई वाघ या राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाल्या होत्या. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली होती.

आता पारनेर पंचायत समितीच्या 12 गणांपैकी सहा गण हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ढवळपुरी, अळकुटी, निघोज गण निघाल्याने इच्छुकांच्या उड्या पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाडेगव्हाण, सुपा असे दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर टाकळी ढोकेश्वर, वडझिरे, जवळा आणि कान्हुर पठार गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. पंचायत समितीसाठी इच्छुक असणार्‍या अनेक राजकीय पुढार्‍यांनी महिला आरक्षण जाहीर होताच आपल्या पत्नींना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीतही खा. निलेश लंके यांना बाजूला ठेवण्यासाठी सर्व विरोधक ऐनवेळी एकत्र होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विधानसभेचा बदला घेण्यासाठी खा. लंके पंचायत समिती ताब्यात घेतील, अशीही एक शक्यता सांगितली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!