युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! खडकाळ माळरानावर पेरूच्या शेतीतून केली लाखोंची कमाई, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणामुळे मिळणार कवडीमोल उत्पादन, बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शासनाचे उदासीन धोरण त्यामुळे बळीराजा अक्षरशा कोलमडला गेला आहे. यामुळे आता नवयुवक शेतीकडे धजावत नसल्याचे चित्र आहे.

मात्र असे असले तरी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील असेही अनेक नवयुवक आपल्याला पाहायला मिळतील जे या परिस्थितीमध्येही शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. आज आपण हिंगोली जिल्ह्यातील अशाच एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने पेरूच्या शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.

जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथील सोपान शिंदे या युवक शेतकऱ्याने खडकाळ माळरानावर पेरूची शेती यशस्वी केली आहे. सुपीक जमीन असूनही कवडीमोल उत्पन्न मिळत असल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सोपान यांनी आरसा दाखवण्याचे काम केले आहे. खरं पाहता सोपान यांच्याकडे सात एकर शेत जमीन आहे.

ते आपल्या शेतजमीनीत पारंपारिक पिकांची शेती करतात तसेच नवीन नगदी आणि फळबाग पिकांची देखील त्यांनी आपल्या जमिनीत लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेताला एक परसबागेप्रमाणे सजवल आहे. शेतामध्ये 50 प्रकारची वेगवेगळी फळझाडे लावण्यात आली असून यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. आंबा, नारळ, एप्पल, फणस यांसारख्या फळझाडांचा यामध्ये समावेश आहे.

याशिवाय त्यांनी शाश्वत उत्पन्न मिळावे या अनुषंगाने रेशीम शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे रेशीम शेतीचा हा प्रयोग सक्सेसफुल झाला असून त्यांना यातून चांगली कमाई होत आहे. एवढेचं नाही तर रेशीम शेतीचा कानमंत्र आपल्या गावातीपा शेतकऱ्यांना देऊन त्यांनी 50 ते 60 शेतकरी बांधवांना रेशीम शेतीमध्ये पारंगत करून सोडल आहे.

दरम्यान सोपान यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या खडकाळ माळरानावर पेरू फळपिकाची लागवड केली होती. आपल्या एक एकर जमिनीत त्यांनी पेरूची लागवड केली. खडकाळ जमीन, अतिशय कमी पाणी तरीही त्यांनी पेरूची शेती यशस्वी करून दाखवली. एवढंचं नाही तर खडकाळ जमिनीत पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून पहिल्या वर्षी हळद पिकवली दुसऱ्या वर्षी कांदा आणि सोयाबीनचे बीजउत्पादन घेतलं.

यामुळे पेरू बागेसाठी येणारा जो काही व्यवस्थापनाचा खर्च होता तो भागवण्यास मदत झाली. दरम्यान आता तिसऱ्या वर्षी या पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून परिसरात नवीन असलेलं राजमा पीक देखील त्यांनी टोकन पद्धतीने लावला आहे. म्हणजेच, प्रयोगाची पराकाष्ठा सोपान यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे प्रयोग नवीन असला तरी देखील ते आपल्या योग्य नियोजणाने सक्सेस करत असल्याने त्यांचे पंचक्रोशीत चांगलेच नाव गाजत आहे.

दरम्यान आता पेरू पासून त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षी पेरूच्या एक एकराच्या बागेतून त्यांना 20 ते 30 हजाराचा नफा राहिला. दुसऱ्या वर्षी 90 हजार पर्यंतचे उत्पन्न मिळालं. मात्र यंदाच्या या तिसऱ्या वर्षाला पेरूच्या बागेतून जवळपास सव्वा लाखाहून अधिक उत्पन्न त्यांना मिळाल आहे. निश्चितच उत्पन्नाचा हा वाढता आलेख पाहता इतर शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

परिसरात आता पेरूच्या बागा दिवसेंदिवस वाढत असून यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. निश्चितच सोपान शिंदे यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असून जर शेतीमध्ये नवनवीन प्रयोगाची पराकाष्टा केली तर निश्चितच लाखोंची कमाई होते हे त्यांनी जगाला दाखवून दिले आहे.